मुंबई (प्रतिनिधी) : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या तारखा  राज्य निवडणूक आयोगाने आज (सोमवार) जाहीर केल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. तसेच ४८ तासांमध्ये तारीख जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकांच्या घोषणा प्रलंबित होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्यांच्या तारखा अखेर न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यावर आता सत्ताधारी आणि राजकीय पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.