कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कोल्हापूर जिल्हायातील आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यांमध्ये आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने फिरते वैदयकीय पथक मोबाईल मेडिकल युनिट सेवा  प्राप्त झाली आहे. जिल्ह्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली मोबाईल मेडिकल युनिट  बस उपलब्ध झाली आहे. याचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

आरोग्य सेवेची आवश्यकता, साथरोग रुग्णांची संख्या विचारात घेवून दरमहा फिरती कार्यक्रम आणि दिवस निश्चित करुन रुग्णांची तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहे. मोबाईल मेडिकल युनिटची पूर्व नियोजीत भेटीबाबत संबधित गांवाना माहिती मिळणार आहे. या भेटीवेळी गावातील आशा स्वयंसेविका, आरोग्यकर्मचारी उपस्थित राहणार आहेत. गंभीर आजरी तसेच व्याधीग्रस्त रुग्णांना सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या अत्याधुनिक बसमध्ये दुर्गम भागातील लोकांना बाहयरुग्णसेवा, थुंकी कोव्हिड संशयितांची रॅपीड ॲन्टीजन टेस्ट तपासणी,  रक्त,लघवी,  दंतचिकित्सा, एक्सरे अहवाल,  वेळ प्रसंगी दुर्गम भागातील गरोदर मातांची प्रसुतीची सुविधा या मोबाईल मेडिकल युनिटमध्ये असणार आहे.

तर या सेवेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन जि.प.चे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले. तर मोबाईल मेडीकल युनिटची सुविधा ज्या दुर्गम भागात उपलब्ध नाही त्या ठिकाणीसुध्दा ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी सांगितले. यामुळे आजरा, भुदरगड, चंदगड तालुक्यातील ५४ वाड्यांवस्तीमधील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जि.प. सदस्य  राजवर्धन निबांळकर, प्रकाश टोणपे, प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. उषादेवी कुंभार,  जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई निवासी वैदयकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, आशा कुडचे, डॉ. स्मिता खंदारे उपस्थित होत्या.