जागतिक जल दिनानिमित्त जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली जलशपथ…

0
60

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक जल दिनाच्या निमित्ताने जगातील शुध्द व सुरक्षित पाण्यासाठी जनसमुदायामध्ये जागृती निर्माण केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज (सोमवार) जागतिक जल दिनाच्या औचित्य साधत कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी जलशपथ घेतली. यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी छतावरील पाणी साठवण पध्दती, जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक पध्दती आणि निर्माण होणारे सांडपाण्याचे शास्त्रशुध्द पध्दतीने व्यवस्थापन या माध्यमातून आपण पाणी बचतीचे छोटे प्रयत्न करून योगदान द्यावे. तसेच जिल्हयातील प्रत्येक नागरिकाने या जागतिक जल सप्ताहामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

तसेच जिल्हयातील सर्व कार्यालये आणि ग्रा.पं. क्षेत्रामध्ये जलशपथ घेतली जाणार आहे. दुपारी २ ते ३.४० या कालावधीत राज्यस्तरीय जल जीवन मिशन अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ऑनलाईन वेब संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. २२ ते २७ मार्च या कालावधीत जलसाक्षरता वाढविण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आलेले आहे. या कालावधीत स्त्रोत आणि पाणी साठवण, टाकी स्वच्छता, साफसफाई अशी कामे केली जाणार आहेत. यासोबतचं ग्रा.पं. क्षेत्रात शून्य गळती मोहिम, जलजीवन मिशन लोगो डिझाईन स्पर्धा, पाणी वाचवा मोहिम, पाण्याचे महत्व विशद करणारी रांगोळी स्पर्धा, चित्रकला, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजकुमार माने जि. प. सदस्य भगवान पाटील, उपमुख्य कार्यकारी आधिकारी(सा.प्र) मनिषा देसाई,  प्रियदर्शिनी मोरे, अरूण जाधव, संजय राजमाने, मनिष पवार,  डॉ. योगेश साळे, राहूल कदम, सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.