कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हापरिषद अंतर्गत काम करणाऱ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांचा गेल्या तीन महिन्याचा पगार झाला नाही.  त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे परत एकदा असंतोष निर्माण झाला असून कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे बोलले जाते.

कोल्हापूर जिल्ह्यातील आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांचा विषय सतत चर्चेत आहे. अनेकवेळा कामबंद आंदोलन करूनही प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या वेळी जिल्हापरिषद समोर जिल्ह्यातील सर्व आशासेविका आणि गट प्रवर्तक यांनी पूर्ण दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने बरेच महिने प्रलंबित राहिलेले वेतन,भत्ता,वाढीव मानधन मिळाले. तसेच यापुढेही याना आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही असेही आश्वासन देण्यात आले होते. पण नोव्हेंबरपासून तीन महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये अनेक विधवा तसेच याच नोकरीवर कुटुंब चालते असे कर्मचारी आहेत. यांचा त्वरीत पगार झाला नाही, तर परत एकदा आशा सेविका आणि गतप्रवर्तक आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचे समजते.

याबद्दल जिल्हा आरोग्यधिकारी डॉ.  योगेश साळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, डिसेंबर आणि जानेवारीचे पगार राहिले आहेत. येत्या काही दिवसात त्यांच्या खात्यावर जमा केले जातील असे सांगितले.