इचलकरंजी (प्रतिनिधी) : जवाहरनगर परिसरात भटक्या कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कुत्र्यांचा पालिकेने तत्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा युवा सेनेने दिला. नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांना आज (बुधवार) याबाबतचे निवेदन देण्यात आले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव गौड यांनी तर पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास तीच कुत्री आरोग्य विभागात सोडू, असा इशारा दिला. जिल्हा युवा अधिकारी शिवाजी पाटील यांनी पालिका कर्मचाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. नगराध्यक्ष सौ. स्वामी यांनी या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सभागृहात हा विषय मांडून कार्यवाही करू, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

या वेळी अविनाश वासुदेव, अभिजित लोले, पवन मेटे, ऋषीकेश चव्हाण, सागर जाधव, रतन वाझे, विकी जाधव, शाहरुख मुजावर, अमित शिरगुरे, विनायक पोवार, कुमार माने, सुनील मंत्याळ उपस्थित होते.