कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली १४ जून रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत शिक्षण संस्थांनी अन्यायकारक फी आकारून पालकांची लूट करू नये अशा सक्त सूचना दिल्या असतानाही काही शाळा पालकांकडून जबरदस्तीने फी वसुली करत आहेत. या शिक्षण संस्थांनी मनमानी थांबवावी, अन्यथा शिवसेना, युवा सेना स्टाईलने हिसका दाखवू, असा इशारा युवासेना शहरप्रमुख अॅड. चेतन शिंदे यांनी दिला. शिक्षण संस्थांकडून पालकांच्या होणाऱ्या लुटीबाबत आणि पिळवणुकीच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे आज (सोमवार) युवा सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे फलक शिक्षण उपसंचालक श्री. सत्यवान सोनवणे यांच्यासमोर फडकविले. शिष्टमंडळाकडून, मे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे शाळांनी शुल्क कपात करावे, फी न भरल्यामुळे शाळेने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, खासगी शाळांकरीता फी नियामक मंडळ स्थापन करावे, तसेच पालक संघटनांनी मागणी केल्याप्रमाणे शाळांच्या ऑनलाईन क्लासेसवर बंदी आणण्याबाबत प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावेत, या मागण्यांचे निवेदन सोनवणे यांना सादर केले.

सोनवणे यांनी उद्या या संदर्भात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात येईल. मनमानी फी आकारणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांवर तत्काळ कारवाई करण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी जिल्हा समन्वयक योगेश चौगले, शहरप्रमुख विश्वदीप साळोखे, शैलेश साळोखे, ओंकार परमणे, कपिल सरनाईक, सौरभ कुलकर्णी, अमृत परमणे, अक्षय कुंभार, आदित्य पोवार, प्रथमेश भालकर, प्रसाद पोवार आदी उपस्थित होते.