तरुणांनी उद्योजक होण्यासाठी अथक परिश्रम करावेत : गडकरी

0
64

नागपूर : तरुणांनी उद्योजक बनण्यासाठी अथक परिश्रम करावेत त्यासाठी भारत सरकारचे वतीने सुरू असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. प्रत्येक कार्यात झोकून देऊन काम करण्याची तयारी ठेवावी संधी तुमच्या पायाशी लोळण घेतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४२ वे राज्य अधिवेशन नागपूर येथे झाले. त्याचे उद्घाटन मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याबाबत सूचना देण्यात येतील, त्यांनी असे सांगितले.

नितीन गडकरी म्हणाले, डॉ. आंबेडकर यांना आदर्श मानून जगणारा सामान्य माणूस शिक्षित झाला. बुध्द विचारांने प्रेरित झाला, प्रशासक बनला. त्याच पद्धतीने तो उद्योजक होऊन नोकरी मागणारा न राहता तो नोकरी आणि रोजगार निर्माण करणारा व्हावा. डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समानतावादी समाज घडविण्यासाठी शिक्षण, बौध्द धम्मानुसार आचरण, उद्योजकता, प्रामाणिकपणा, तंत्रज्ञान यांचा अवलंब करावा.

या अधिवेशनात राज्यभरातून कर्मचारी पतपेढी, बँकेत संचालक म्हणून निवड झालेल्या संघटना प्रतिनिधींना नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यामध्ये कोल्हापूरच्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे नूतन संचालक गौतम वर्धन यांचाही सत्कार करण्यात आला. राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी संघटनेच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे यांनी २०१७ पासून रखडलेल्या पदोन्नती बाबत गडकरी यांना लक्ष घालण्याची विनंती केली. शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापूरमध्ये २८ नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून घेण्याचे जाहीर केले.