पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील सचिन अरुण पाटील याने चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  याबाबत पीडित मुलीच्या आईने पन्हाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या (पोस्को) अंतर्गत पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी सचिन पाटील यास ताब्यात घेतले आहे.

संशयित आरोपी सचिन पाटील (वय ३३) याचा कोतोली येथे हॉटेलचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी व पीडित मुलगी उत्रे येथील एकाच गल्लीत राहतात. संशयित आरोपीचे पीडित मुलीच्या घरी सतत येणे-जाणे होते. याचा गैरफायदा घेऊन सचिन पाटील याने पीडित मुलीबरोबर जानेवारी ते मार्च २०२२ वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

पन्हाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्याने उपचारासाठी कोल्हापूर येथे नेले असता, डॉक्टरांनी पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. हा प्रकार समजल्यानंतर तिच्या आई व नातेवाइकांनी पन्हाळा पोलिसांत धाव घेतली. पन्हाळा पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडित मुलीने सचिन पाटील या युवकाने घरात व बाथरूममध्ये वेळीवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगितले.