कोल्हापूर  (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी ‘ई पास’ बंधनकारक असताना पास न काढता बेकायदेशीरित्या विनापरवाना कट्यार सारखे धारदार हत्यार जवळ बाळगून मंदिरात प्रवेश करणाऱ्यास एका तरूणास ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अरुण अशोक घोलपे (वय ३४ रा. वेताळ पेठ, गल्ली नं ३, इचलकरंजी) याला अटक करून  त्याच्याकडील  धारदार  शस्त्र जप्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारदीय नवरात्र उत्सवामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान समितीने ‘ई पास’ बंधनकारक केला आहे. परंतु सोमवारी सकाळी संशयित अरुण घोलपे याने विना ईपास मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला पोलिसांनी दरवाजा जवळ अडवले असता त्याच्याजवळ कट्यारसारखे हत्यार आढळून आले. याप्रकरणी अरुण घोलपे यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला  आहे.