आर्थिक फसवणुकीतूनच तरुणाची आत्महत्या : नातेवाईकांची शिरोली पोलिसात तक्रार

0
337

टोप (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील शिरोली एमआयडीसी येथे देसाई पेट्रोल पंपाच्या मागे सांगली जिल्ह्यातील मालेवाडी येथील ओंकार भगवान इंदुलकर (वय २४, रा. मालेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) याने ६ डिसेंबरला झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. ही आत्महत्या आर्थिक फसवणूकीतून केली असल्याची फिर्याद स्वरुपा भगवान इंदुलकर (वय १९, रा.मालेवाडी ता.वाळवा जि.सांगली मुळगाव कोडोली, ता.पन्हाळा जि. कोल्हापूर) यांनी युवराज बाजीराव पाटील (रा.हळदी, ता.करवीर) आणि सुधीर शिदे यांच्या विरोधात शिरोली पोलिसात दिली आहे.

पोलिसातून दिलेल्या माहितीनुसार, देसाई पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस ओंकार इंदुलकर याने ६ डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या आर्थिक फसवणूकीच्या कारणातून केली असल्याचे फिर्याद दिल्याचे सांगितले. तर युवराज बाजीराव पाटील आणि सुधीर शिदे हे ओंकार याचे ड्रायव्हर व्यवसायामधील ओळखीचे मित्र असल्याचे सांगितले. ओंकारच्या मामांनी युवराज  पाटील कडून ट्रक खरेदी करताना नोटरीद्वारे करारनामा केला. १२ चाकी टाटा कंपनीचा ट्रक नं. एमएच-०९-सीयु-४५०९ हा ट्रक १६ लाख ५० हजारांमध्ये व्यवहार ठरवण्यात आला होता. यावेळी ट्रकचा मालक युवराज पाटील याला २ लाख रुपये दिले. तसेच त्या ट्रकवरील एचडीबी फायनान्स कंपनीचे कर्जाची रक्कम ओंकार याचे  मामांनी दरमहा ४४ हजाक ४९४ रुपये इतक्या दराने कर्ज फेडण्याचे करारामध्ये ठरविले होते.  ते कर्ज पुर्ण संपल्यानंतर ट्रक हा ओंकारचे मामा अनिल महादेव घोरपडे यांचे मालकीचा करण्याचा करार केला होता.

युवराज पाटील याने जून २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात ट्रकच्या कर्जाचे हप्ते ओंकारला भरता आले नाहीत. फायनान्स कंपनीकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी कर्जदारांना सुट दिलेली होती.  त्यामुळे फायनान्स कंपनीने ट्रकच्या हप्त्याबदल कोणताही तगादा लावला नाही. तरी सुद्धा  ओंकारची फसवणूक करीत युवराज पाटील याने हा ट्रक सुधिर शिंदे याला परस्पर दिला. त्यामुळे ओंकारने सुधिर शिंदे याच्याकडे ट्रकला दिलेले दोन लाख रुपये आणि  कर्जाच्या हप्त्यातील दीड लाख रुपये असे एकुण ३ लाख ५० हजार इतकी रक्कम परत करण्यासाठी वारंवार विचारले. तरीसुद्धा युवराज पाटील आणि सुधिर शिंदे यानी ओंकार याला पैसे दिले नाहीत. त्यामुळे या दोघांनी आपली आर्थिक फसवूक केल्याची चिठ्ठी ओकांर याने आत्महत्येवेळी लिहून ठेवली होती.