कळे (प्रतिनिधी) :  जनावरांचा गोठा बांधण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास  महामंडळाचे  कर्ज प्रकरण मंजुर असताना पैसे देण्यास पुनाळ ता.पन्हाळा  येथील एका जिल्हा बँक शाखेतील बँक इन्स्पेक्टर आणि   शाखाधिकाऱ्याने टाळाटाळ केली. याच नैराश्येतून (माजनाळ, ता. पन्हाळा) येथील  जय बाळासो डवंग या युवकाने विष प्राशन करुन ऑगस्टमध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणी बँक इन्स्पेक्टर राजेंद्र आनंदा बेलेकर (रा. कळे) आणि शाखाधिकारी नामदेव गुंडा खोत (रा. खोतवाडी)  या दोघांवर  कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांतुन मिळालेल्या माहितीनुसार, माजनाळ येथील  जय डवंग यांनी आण्णासाहेब महामंडळाकडं जनावरांचा गोठा बांधण्यासाठी सुमारे १० लाख रुपयांचे प्रकरण मंजुरीसाठी पाठविलेलं होतं. यावेळी  २०२० च्या  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत  मदत न केल्याचा डाव मनात ठेवून विरोधकांच्या राजकीय दबावामुळे  ते प्रकरण नामंजुर   करण्यात आले. मात्र,  सत्ताधारी गटात असणाऱ्या नेत्यांनी २०२१ ला त्याचे या योजनेचं प्रकरण मंजुर केले. पण पुनाळ येथे असणाऱ्या एका  जिल्हा बँकेच्या बँक इन्स्पेक्टर राजेंद्र बेलेकर आणि शाखाधिकारी नामदेव खोत यांच्याकडुन गेली तीन महिने मंजूर कर्ज प्रकरणाचे पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली होती.

२० ऑगष्टला जय बँकेमध्ये  गेला असता, त्याला तु कर्ज कसे फेडणार, हप्ते कसे देणार. त्यामुळे तुझं मंजुर झालेली रक्कम २४ तारीखेला परत जाणार आहे, असे बँक इन्स्पेकटरने सांगितल्यावर तेथून निराश होऊन जय घरी परत आला. कर्ज प्रकरणाचे पैसे मिळत नसल्याने  जयने तणनाशक प्राशन करुन ज्या ठिकाणी जनावरांचा गोठा बांधणार होता त्याचठिकाणी आपलं जीवन संपवून टाकलं.

त्यामुळे माजनाळ ग्रामस्थांच्या वतीने कळे पोलीस ठाण्यात एकत्र येऊन कर्ज प्रकरण मंजूर असताना पैसे देण्यास विलंब करणाऱ्या अधिकारी याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीच निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी मयत युवकाचे वडील बाळासाहेब भिवा डवंग (वय ६०, रा. माजनाळ) यांनी  कळे पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास कळे पोलिस ठाण्याचे सपोनि. प्रमोद सुर्वे करत आहेत.