तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी : रेखावार

0
61

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तरुण-तरुणींनी उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय विभागांच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अल्पसंख्याक विकास महामंडळाअंतर्गत शैक्षणिक कर्ज मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक (जिल्हा विकास) आशुतोष जाधव तसेच विविध विभाग व महामंडळांचे व्यवस्थापक उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व नागरिक, उद्योजक, नवउद्योजकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, कर्ज पुरवठा योजनांचा लाभ घेऊन औद्योगिक क्षेत्रात प्रगती करावी. शासकीय विभाग व महामंडळांच्या सहकार्यातून उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन रेखावार यांनी केले. प्रास्ताविक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी आभार मानले.

उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात देण्याच्या उद्देशाने महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमास तरुण-तरुणी, महिला उद्योजकांसह नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये विविध विभागांचे माहिती पत्रक, सर्व योजनेचे कर्ज मागणी अर्ज, ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशील व संपूर्ण माहितीसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग राज्यस्तर, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान विभाग, जिल्हा रेशीम कार्यालय, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सारथी संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यासह विविध महामंडळे आणि इतर विभागांनी नागरिकांना विविध कर्ज पुरवठ्याच्या विविध योजनांची माहिती देऊन प्रस्ताव सादर करुन घेतले.