रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोरोनाकाळात आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. अजूनही यावर राज्य सरकार तोडगा काढण्यात अयशस्वी ठरले आहे. यामुळेच कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लांजा तालुक्यातील कोर्ले गावात ही घटना घडली आहे. महेश झोरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

महेश झोरे हा अत्यंत मेहनती मुलगा होता. आई-वडील आणि दोन भाऊ कामानिमित्त मुंबईला राहत होते. अभ्यास करण्यासाठी महेश कोर्ले गावाकडच्या घरी आला होता. स्पर्धा परीक्षा पास होऊन मोठा अधिकारी बनायचे अस महेशचे स्वप्न होते. एकटा राहणाऱ्या महेशला भेटण्यासाठी त्याचे आजोबा कोर्ले इथल्या घरी नेहमी जात होते. गुरुवारी महेशचे आजोबा कोर्ले इथल्या घरी आले. त्यावेळी महेशने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. महेशच्या आजोबांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला. पण महेशने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली होती. यात एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने नैराश्यातून मी आत्महत्या करत असल्याचं या चिठ्ठीत त्याने नमूद केले होते. लांजा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या संदर्भात माहिती देण्यासही टाळाटाळ करण्यात येत आहे.