तुम्ही चार द्यावेत, पण दोन घ्यावेच लागतील : शिवसेना

0
199

मुंबई  (प्रतिनिधी) : राजकारणात दोन द्यावे आणि दोन घ्यावेत. भाजपची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील आणि सत्ताधाऱ्यांनी याची तयारी ठेवायलाच हवी,  अशा शब्दांत शिवसेनेने भाजप आणि मोदी सरकारवर शिवसेनेचे मुखपत्र  ‘सामना’ च्या अग्रलेखातून  तोफ डागली आहे.   राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळ्यांवर राज्य करणे सोपे असते, असे म्हणत “मेंढपाळाची वेदना” या शिषर्काखाली लिहिलेल्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.  

सरकारच्या खोटेपणावर बोलणे यास राज्यकर्ते अपमान म्हणत असतील तर लोकशाहीचा अंतकाळ जवळ आला आहे. थंडीवाऱ्यात पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एक महिन्यापासून बसला आहे. ते शेतकरी लोकशाही  स्वातंत्र्याचे मारेकरी आहेत,  असा चिखल मोदी सरकारने उडविला आहे.  आपल्या पंतप्रधानांना शेतकऱ्यांची जखमही माहीत आहे आणि उपचारही माहीत आहे, पण मोदी यांची तऱ्हा अशी की,  दुखणे पोटाला व प्लास्टर पायाला. सरकार किंवा राजा करतो, ते सर्व बरोबर या भूमिकेत आजचे सरकार आहे,  अशीही टीका करण्यात आली आहे.