मुंबई (प्रतिनिधी) : ‘आधी तू लस घे, मग मी घेतो’, अशी मानसिकता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तयार झाली आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आहे. ते आज (बुधवार) राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री टोपे म्हणाले की, लस घेण्याबाबत कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यासाठी छोटे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवले जात आहेत. राज्यात देण्यात येणाऱ्या कोरोनावरील दोन्ही लस सुरक्षित असल्याची  खात्री वैज्ञानिकांनीच दिली आहे. त्यामुळे कोविड लसीकरण कार्यक्रमात आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत  आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाबाबत चुकीचे विधान किंवा माहिती माध्यमांतून जाऊन कन्फ्युजन होऊ नये याची काळजी माध्यमांनी घ्यावी, असे आवाहनही टोपे यांनी यावेळी केले.