मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या सर्व संघटना बरखास्त झाल्या असून सर्व नेतृत्व भाजपकडे आले आहे. त्यावर असह्य होऊन अवघड स्थिती झाल्याने संजय राऊत वारंवार यात भाजपचा हात असल्याचे म्हणत आहेत. कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात हात असेल, तर आमचा हात आहे. आम्ही तो काही अमान्य करत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले की, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजपचा हात असल्याचे मान्य आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या युनियन लिडरवर विश्वास नाही. त्यांनी कर्मचाऱ्यांना फसवले आहे. सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना बरखास्त झाल्या आहेत. आणि आंदोलनाचे नेतृत्व भाजपकडे आले आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.