इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील ३३ पैकी २३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाने बाजी मारली आहे. प्रामुख्याने आलास, यड्राव, नांदणी, दानोळी या सारख्या १५ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. धरणगुत्तीमध्ये मात्र यड्रावकर गटाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. १५ पैकी एकाही जागा या गटाला जिंकता आली नाही.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणी शांततेत पार पाडली. निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या नियोजन शिस्तबद्धपणे केले होते. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.  कवठेगुलंद, शिरढोण, शिरटीमध्ये काही प्रभागमध्ये समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. शिरदवाड व दत्तवाड या गावांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. नृसिंहवाडी, दानोळी, कोथळी, उदगाव येथे फेरमतमोजणीचे अर्ज दाखल करण्यात आले, पण आहे तीच मताची स्थिती दिसून आली.

महाविकास आघाडी व यड्रावकर गट प्रणित गटाने कुटवाड, हसूर, गौरवाड, गणेशवाडी, जैनापूर, दानोळी, तमदलगे, नांदणी, निमशिरगाव, कोंडिग्रे, सिंहवाडी, शिरदवाड, जुने दानवाड, आलास, मजरेवाडी, टाकळीवाडी, अर्जुनवाड, घालवाड, कवठेगुलंद, बुबनाळ, यड्राव, दत्तवाड या ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.