यड्राव ग्रामपंचायत ‘त्या’ ठेकेदाराचा परवाना रद्दची मागणी करणार : कुणालसिंह नाईक-निंबाळकर

0
40

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीची परवानगी न घेता ठेकेदार अमित कांबळे (रा. हरोली) यांनी मातंग समाज आणि खाटिक समाजाच्या वस्तीत रस्ते व गटर्सचे काम सुरू केले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून परस्परच मंजुरी घेतली. तसेच शिरोळ पंचायत समितीकडून ई-टेंडर प्रक्रियाही परस्परच पूर्ण केले. ग्रामपंचायतीने हे काम बंद पाडले. सर्व कामांचे ई-टेंडरही रद्द केले. तरीही कांबळे यांनी ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या ठिकाणी काम न करता व कामाचा आदेश न घेता इतरत्र काम केलेले आहे. याबद्दल त्यांचा ठेका परवाना रद्द करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेकडे करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याची माहिती सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

निंबाळकर यांनी सांगितले की, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे वस्तींचा विकास करणे योजनेअंतर्गत यड्राव येथे खाटिक आणि मातंग समाज वस्तीत सुमारे ७ लाखांचे रस्ते व गटर्सचे काम करण्याचा निर्णय एप्रिल महिन्यात झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. याच सभेत जि.प.सदस्य यांचा अर्ज देऊन बऱ्याच कामाचे ठराव ग्रामपंचायतीकडून मागणी करून घेतले आहेत.

मात्र, ठेकेदार अमित कांबळे यांनी सदर ठरावांचा गैरवापर करून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून ग्रा.पं.चे पत्र नसतानाही अंदाजपत्रक तयार करून घेऊन तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेतली आहे. शिरोळ कार्यालयाकडून ई-टेंडर प्रक्रिया परस्पर पूर्ण केलेली आहे. याबाबत ग्रा. पं. कडे एकही पत्रव्यवहार किंवा माहिती दिलेली नाही. कांबळे यांनी आदेश न घेता काम सुरू केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामपंचायतीने हे काम बंद केले. त्यानंतर या ठेकेदाराचे सर्व कामांचे ई-टेंडर रद्द केले आहे. तथापि, त्याने ग्रामपंचायतीने स्थळ निश्चित केलेल्या ठिकाणी काम न करता व कामाचा आदेश न घेता इतरत्र काम केलेले आहे. ही बाब गंभीर व बेकायदेशीर आहे.

त्यामुळे सदर ठेकेदाराचा ठेका परवाना रद्द करण्याबाबत कारवाई व्हावी अशी जिल्हा परिषदेकडे मागणी करण्याचा निर्णय सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी घेतला आहे. या वेळी उपसरपंच सौ. प्राची हिंगे, ग्रा. पं. सदस्य रंगराव कांबळे उपस्थित होते.