नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले होते. आता हे आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित केले असल्याची माहिती कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिली. हा निर्णय केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला.
बजरंग पुनिया पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘आम्ही या बैठकीत काही मुद्द्यावर चर्चा केली. पोलिसांची चौकशी ही 15 जूनपर्यंत पूर्ण होईल. क्रीडा मंत्र्यांनी आम्हाला विनंती केली की, तोपर्यंत तुम्ही तुमचे आंदोलन स्थगित करा.’ बजरंग पुनिया म्हणाला की, ‘क्रीडा मंत्र्यांनी महिला कुस्तीपटूंच्या सुरक्षेची देखील काळजी घेतली जाईल, असे सांगितले. आम्ही त्यांच्याकडे कुस्तीपटूंविरूद्ध दाखल केलेल्या सगळ्या एफआयआर मागे घेण्याची देखील मागणी केली आहे. त्यांनी हे मान्य केले आहे.’
दरम्यान, कुस्तीपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची शनिवारी (3 जून) रोजी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये गृहमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याचेही बजरंग पुनिया याने सांगितले होते. याचबरोबर सर्व कुस्तीपटू नोकरीवर परतले होते. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शेतकरी संघटना आणि खाप पंचायत यांनी देखील सबुरीचा पवित्रा घेतला. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील 9 जून रोजी होणारी महापंचायत कुस्तीपटूंच्या विनंतीवरून पुढे ढकलले.