कोल्हापूर (प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठ आणि यूजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज समावेशी संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक दिव्यांग दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.   
प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी नेहमी चौकस आणि सर्जनशील असले पाहिजे. निरीक्षण करून नवीन गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी आपुलकीने स्वीकारले पाहिजे. दिव्यांग विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिव्यांग दिनानिमित्त दृष्टी दिव्यांग मित्रांच्या मदतीने सामान्य मित्रांसाठी एक विशेष अभिनव उपक्रम यामध्ये दृष्टी दिव्यांग मित्रांचा प्रवास हा पांढऱ्या काठीपासून विज्ञान तंत्रज्ञानापर्यंत मांडण्यात आला. सहना एनेगिरी या दिव्यांग विद्यार्थिनीने तिच्या जीवनातील अनुभव सांगितले. संगीता निकम, संतोष परीट यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक यूजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीजच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी केले. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाची सहजता वाढवण्यासाठी नवनवीन कल्पना सुचवाव्यात, असे आवाहन केले. सतीश नवले यांनी आभार मानले.