मुंबई (प्रतिनिधी) : वयाच्या साठीनंतर होणारा संधिवात हा आजार आता प्रामुख्याने तिशी- पस्तीशीतील तरूणाईमध्ये दिसून येत आहे. पाठ दुखणे, हाडे दुखणे, आमवात अशा विविध कारणांनी तरूण मुले – मुली सध्या त्रस्त आहेत. तसेच थंडीच्या काळात अनेक लोकांना संधिवाताचा त्रास असहाय होत असल्याचे जाणवतो.

लठ्ठ असणाऱ्या लोकांना संधिवात होण्याची शक्यता जास्त असते. हाय हिल्स घातल्याने पायाची ठेवण थोडीशी बदलून सांधे आणि स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे पाठदुखी तसेच पाय दुखू शकतात. शरीरावर झालेल्या जुन्या जखमा ही संधिवाताला कारणीभूत असू शकतात. गुडघ्याला दुखापत झालेल्यांना आथ्रायटिस होण्याची शक्यता असते.

सारखे चॅटींग करणेही आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. मोबाईलवर चॅट करत असताना तुमच्या अंगठ्यावर ताण येऊन अंगठा दुखू शकतो. तसेच तुमची मान आणि खांद्यावरही ताण येऊ शकतो. जर तुम्हाला दुखण्यापासून दूर राहायचे असेल तर अंगठ्याने मॅसेज टाईप करण्याचे कमी करा. त्यापेक्षा व्हॉईस कॉल अथवा व्हिडिओ कॉल करा.

जीवनशैलीत बदल करा

जास्त साखर, मैद्याचे पदार्थ तसेच प्रोसेस़्ड फूड खाल्याने वजन वाढते. त्यामुळे संधिवात वाढू शकतो. त्यामुळे आहारात फळे, कडधान्ये, नट्स यांचा समावेश करावा. नियमित व्यायाम, मॉलिश, योग्य आरोग्य प्रणालींचा उपयोग करून संधिवातापासून दूर रहा. उठता- बसताना जेवताना, झोपताना तुमच्या शरीराची रचना (पोश्चर) योग्य राहील, याकडे लक्ष द्या.