कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील वाहन तपासणी केंद्रासाठी १३६ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी मोरेवाडी येथील केंद्रासाठी १३ कोटी मंजूर झाले आहेत. येत्या महिनाभरात मोरेवाडी येथील तपासणी व प्रमाणपत्र केंद्राच्या कामास सुरुवात होईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. आरटीओच्या कार्यक्रमात बोलत होते.

ना. पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील झालेल्या अपघातांबाबत विश्लेषणात्मक अहवाल तयार करावा. झालेल्या अपघातांची कारणे काय आहेत. सीट बेल्ट न वापरणारे किती अपघात, अपघातात विद्यार्थ्यांची संख्या किती याबाबत सविस्तर अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाने सादर करावा. हा अहवाल राज्याला सादर करु. यातून निश्चितच पुढील उपाययोजनांसाठी मदत होईल.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, वाहतुकीचे नियम पाळण्यासठी प्रबोधनात्मक प्रादेशिक परिवहन विभागाने परिसरातील भिंती बोलक्या केल्या आहेत. रस्ता सुरक्षा मार्गदर्शक पुस्तिकेची निर्मिती केली आहे. याच पध्दतीने आपण सर्वांनी जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशिल राहू या. महामार्गावर सुरक्षितपणे वाहतूक करता यावी, असे महामार्ग बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. वेगाचे नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या गाड्यांचे उत्पादन व्हावे. प्रादेशिक परिवहन विभाग हा महसूल मिळवून देणारा विभाग आहे. त्यामुळे रस्त्यासाठीही अधिक निधी द्यायला हवा. वाहतुकीची शिस्त नागरिकांमध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु आणि कोल्हापूर पॅटर्न राज्याला देवू असे ते म्हणाले.