मुंबई  (प्रतिनिधी) : राजकीय नेत्यांचे महिलांसंबंधित प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यातच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महिला पुरुषासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये वर्षभर एकत्र राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला,  असे वादग्रस्त वक्तव्य आझमी यांनी केले आहे.

अबू आझमी यांनी पुढे म्हटले की, देशाचा कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय आहे?  तर तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्यात कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहतील आणि नंतर सांगतील माझा बलात्कार झाला.   एखाद्या महिलेचे जर लग्न झाले नसेल, तर पतीसोबत जे कृत्य करता येते, ते ती कुठल्याही परपुरुषासोबत करु शकत नाही. कुठल्याही महिलेने परपुरुषासोबत राहू नये,  हा इस्लामी कायदा आहे. खरे तर प्रत्येक धर्मात हेच आहे. मात्र, आज आधुनिक काळात पाश्चात्य वारे वाहू लागले आहे. त्यामुळे  लोक वाहवत जात आहेत. याचा फायदा उचलून लोक गैरफायदा घेताना दिसत आहेत, असेही आझमी यांनी म्हटले आहे.