मुंबई (प्रतिनिधी) : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे अध्यक्ष संभाजी ऊर्फ मनोहर भिडे यांनी नुकतेच केलेल्या आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. यावरून आता राज्य महिला आयोग भिडेंविरोधात अधिक कडक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. भिडे यांनी आपली बाजू स्पष्ट करावी, असे आदेशच महिला आयोगाने दिले आहेत. संभाजी भिडे यांनी मुंबईत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

शिंदेंच्या भेटीनंतर साम वृ्त्तवाहिनीच्या एक महिला पत्रकार त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेल्या होत्या. या महिला पत्रकाराला पाहून भिडे म्हणाले की, ‘आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लावून या मग तुमच्याशी बोलेन.’ संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधानानंतर महिला संघटनांचा निषेध नोंदवला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना या प्रकरणी नोटीस पाठवलेली आहे. स्त्रीचे दर्जा हा तिच्या कर्तृत्वाने सिद्ध होतो.

आपले वक्तव्य स्त्री सन्मान आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचविणारे आहे. त्यामुळे आयोगाने या प्रकरणात दखल घेतली आहे. कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा करावा, अशा आशयाची नोटीस भिडेंना पाठवण्यात आली आहे.