टोप (प्रतिनिधी) :  शिरोली पुलाची सांगली फाटा येथे उड्डाण पुलाखालून रस्ता पार करत असणाऱ्या महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल (बुधवार) रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. विशाखा तात्यासाहेब कांबळे (वय ३९, रा. समता परिसर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) असे या मृत महिलेचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा यांच्या नातेवाईकाचे मुंबई येथे निधन झाले होते. त्यांच्या रक्षाविसर्जनाच्या कार्यासाठी बहिण, चुलते आणि अन्य नातेवाईक यांच्यासोबत बुधवारी पहाटे गाडी क्र. एमएच ०९ सीएम ६५५८ ने  मुंबई गेल्या होत्या. तेथील कार्य उरकून त्या शिरोली आपल्या गावी रात्री १ वाजेपर्यंत येणार असल्याचे आपल्या पतीला फोन करून मला सांगली फाटा येथे घेण्यासाठी या असे सांगितले होते. त्यानुसार विशाखा यांची कार सांगली फाटा येथे १  वाजण्याच्या सुमारास आली. कार सलगर चहा येथे थांबवून कारमधून उतरून विशाखा या उड्डाण पुलाखालून येत असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बुधवारी रात्री पावसाचा जोर असल्याने समोरील काही दिनासे झाले होते. त्यामुळे हा अपघात झाल्याचे नातेवाईकांना दिसलेच नाही. या अपघाताची फिर्याद मनिषा पांडुरंग कांबळे यांनी शिरोली पोलिस ठाण्यात दिली आहे.  अधिक तपास शिरोली पोलीस करीत आहेत.