कदमवाडी येथे पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा जागीच मृत्यू…

0
77

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील कदमवाडी परिसरात असणाऱ्या घाडगे कॉलनी येथे शिवांजली रेसिडेन्सीमधील पाचव्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला. मंजुषा विनायक कागले (वय ३९) असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल (रविवार) रात्री उशिरा घडली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, विनायक कागले हे पत्नी, वृध्द आई आणि मुलांसमवेत शिवांजली रेसिडेन्सीमधील पाचव्या मजल्यावर राहात होते. काल रात्री उशिरा कागले कुटुंबीय जेवण करून खोलीत गप्पा मारत बसले होते. विनायक यांना मणक्याचा विकार असल्याने पत्नी मंजुषा यांनी त्यांच्या पाठीला मलम लावला. यावेळी गरम पाण्याच्या शेक देण्यासाठी त्या स्वयंपाकाच्या खोलील शेजारी असणाऱ्या पोर्चमध्ये गेल्या. त्याचक्षणी बेसमेंटमध्ये काही तरी पडल्याचा मोठा आवाज झाला. विनायकसह त्यांच्या वृध्द आई पोर्चमध्ये धावल्या. मात्र मंजुषा पोर्चमध्ये आढळल्या नाहीत.

यावेळी विनायक यांनी बेसमेंटच्या दिशेने डोकावले असता मंजुषा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. याच्या आवाजामुळे रेसिडेन्सी आणि परिसरातील नागरिकही घटनास्थळी जमा झाले होते. मंजुषा यांचा डोक्यावर आदळल्याने जागीच मृत्यू झाला होता. यावेळी शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मंजुषा यांचा मृतदेह उत्तरयीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आला.