कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिक्षक नेते दादासाहेब लाड, राज्य कृती समितीचे बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य कायम शाळा विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे, शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मानसिंगराज निंबाळकर आणि इचलकरंजी येथील संभाजीराव खोचरे यांनी उमेदवारी मागे घेतली. कोल्हापुरातील प्रमुख उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने त्याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांना होईल असा दावा महाविकास आघाडीने केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून एकच उमेदवार असावा यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान काँग्रेसकडे एकूण ११ जणांनी उमेदवारी मागितली होती. दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या ट्रॅक्टर रॅलीप्रसंगी पुणे विभागीय मतदारसंघातून शिक्षक किंवा पदवीधरमधील एक जागा आम्हाला द्या, निवडून आणण्याची जबाबदारी माझीअशी ग्वाही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिली होती. पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांना तर शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी काँग्रेसकडून जयंत आसगावकर यांना जाहीर झाली. त्यामुळे शिक्षकमधून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्यांनी माघार घेतली आहे.

शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी महाआघाडीच्या अनेक नेत्यांनी विशेषत: जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आवाहनाचा आदर राखत माझी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी माघार घेत आहे, असे स्पष्ट केले. जगदाळे यांनी पालकमंत्री पाटील यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्याची स्वीकारलेली जबाबदारीमुळे मी शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मागे घेत, असल्याचे सांगितले. प्रा. मानसिंगराज निंबाळकर यांच्यासोबतही पालकमंत्री सतेज पाटील यांनी चर्चा केली. त्यानंतर निंबाळकर यांनीही माघार घेणार असल्याचे सांगितले.