कोल्हापूर  (प्रतिनिधी) : ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या कंपनीच्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील ‘कन्यादान’ नको, तर ‘कन्यामान’ म्हणा’, असा धार्मिक कृतींविषयी अपप्रचार केलेली जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. या जाहिरातीचा निषेध करण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आज (शनिवार) वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शोरूम समोर निदर्शने केली.

या जाहिरातीमुळे व्यापक आणि उच्च मूल्य जोपासणार्‍या धार्मिक विधीविषयी लोकांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवला  आहे. वेदांत फॅशन्स लि. कंपनीने हिंदूंची बिनशर्त क्षमा मागून ही जाहिरात त्वरित मागे घ्यावी,  अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी यावेळी केली.

या जाहिरातीतून ‘कन्यादान’ कसे चुकीचे आहे, प्रतिगामी आहे.  तसेच ‘दान करायला कन्या वस्तू आहे का ? , असे संभ्रम निर्माण करणारे प्रश्‍न केले आहेत. ‘कन्यादान’ नको, तर कन्यामान’, असा थेट परंपरा बदलण्याचे आवाहन केले आहे. आदिशक्ती म्हणून स्त्रीची पूजा केली जाते. असे असताना त्याविषयी चुकीचा संदेश पसरवणार्‍या वेदांत फॅशन्स लि. कंपनीने अन्य धर्मातील महिलांविषयी चुकीच्या प्रथा-परंपरांविषयी प्रबोधन करणारी जाहिरात काढण्याची हिंमत दाखवावी. ही जाहिरात मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा डॉ. धुरी  यांनी यावेळी दिला.