कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने व व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.  कोल्हापूर शहरात रात्री ८ वाजता दुकाने बंद करण्यासाठी प्रशासनाकडून दबाव तंत्र वापरले जात आहे. तरी हा आदेश मागे घेण्यात यावा, अशी मागणी करून भाजपच्या शिष्टमंडळाने प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीचे फार मोठे संकट नसतानाही राज्य सरकारने घोषीत केलेल्या रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कडक निर्बंध लादण्याचे कारणच काय? उष्मा वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक खरेदीसाठी संध्याकाळीच बाहेर पडत आहेत. परंतु रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाकडून दबाव तंत्र वापरले जात आहे. त्यामुळे समाजातील सर्वच घटकामध्ये असंतोष वाढू लागला आहे. ८ वाजता दुकाने बंद केल्याने व्यवसायावरच कुऱ्हाड कोसळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमांवर थर्मल चेकिंग, रॅपीड टेस्ट आदी आवश्यक गोष्टींचे प्रयोजन करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी भाजप सरचिटणीस हेमंत आराध्ये, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, सचिन तोडकर, चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष विक्रम राठोड, उद्योग आघाडी अध्यक्ष कालिदास बोरकर, महिला अध्यक्षा गायत्री राऊत, अप्पा लाड, किरण तासगावे, आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.