कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे घटक पक्ष असलेले रयत क्रांती संघटनेकडून आमदार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी भरायला लावली होती. पण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर ते लढण्याआधीच आपल्या उमेदवाराची माघार होईल, असे स्पष्ट केले आहे.

मी भाजपमध्ये समाधानी आहे, अशीही त्यांनी माध्यमांशी बोलताना सारवासारव केली. मी याचक नाही. बळकट आहे. जिवंत असेपर्यंत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपने खोत यांना अडगळीत टाकले आहे. म्हणून ते नाराज असल्याने बंड करणार असल्याची चर्चा होती. यातूनच त्यांनी आपल्या रयत संघटनेकडूनही पदवीधरमधून उमेदवारी जाहीर केली. कोल्हापूरचे प्राध्यापक एन डी चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी बैठक केली. नाराजी दूर केली. यामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार सांगितले.