कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरीविरोधी तीन काळे कायदे मागे घ्यावेत, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज (गुरुवार) शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, कंत्राटीकरण रद्द करावे, लॉकडाऊन काळातील घरगुती, शेतीचे वीज बिल माफ करावे,  पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ कमी करावी, नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, उसाची तोड झाल्यापासून १४ दिवसांच्या आत बिल संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे, अशा मागण्या शेकापतर्फे करण्यात आल्या आहेत.

माजी आमदार संपत पवार – पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तिथे आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. या मोर्चात माजी प्राचार्य टी. एस. पाटील, संतराम पाटील आदी सहभागी झाले होते.