कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्यांच्या सत्तेच्या काळात शिक्षक बँकेचे लायसन रद्द होण्याची नामुष्की आली होती, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. स्वतःच्या चेअरमनपदाच्या काळात आपण काय दिवे लावलेत हे सूज्ञ सभासदांना माहीत आहे. त्यामुळे सतरा भानगडी असणाऱ्या विरोधकांना सूज्ञ सभासद जागा दाखवतील, अशी टीका राजाराम वरुटे यांनी केली.

ते कबनूर तालुका हातकणंगले येथे शिक्षक संघ सत्तारूढ पॅनेलच्या प्रचार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुकाणू समितीचे दा. श. सुतार होते. ते म्हणाले, सध्या विरोधी संघ समिती पॅनलचे उमेदवार रवीकुमार पाटील बँकेचा नफा खोटा असल्याचे बोलत आहेत. त्यांच्या या अज्ञानाची किव करावीशी वाटते. बँकेच्या लेखपरीक्षणातून नफ्याची आकडेवारी जाहीर होते. २००९ पूर्वी विरोधकांकडे सत्ता होती. या काळात बँकेचे प्रचंड नुकसान झाले आहे. २०१० साली सर्व संचालकांनी काटकसरीचा कारभार करून शिक्षक सभासदांची आर्थिक संस्था वाचवली. व्याजदर १५ वरून १० टक्क्यावर आणला आहे. जिल्हाभर सत्तारूढ संघाला मिळत असलेला पाठिंबा पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.

एमएससीआयटी, मुख्यालयी राहण्याची अट, आगाऊ वेतनवाढ, विज्ञान प्रमोशन या व अन्य शिक्षकांच्या समस्यांसाठी नेहमीच पाठपुरावा केला आहे. भविष्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक कर्ज देण्याची योजना बँकेमध्ये राबवली जाईल, असे ते म्हणाले.

विद्यमान संचालक राजमोहन पाटील म्हणाले, शिक्षक संघाच्या नेतृत्वाने हातकणगले तालुक्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकत भरघोस तीन जागा दिल्या आहेत. संघाच्या सर्व उमेदवारांना तालुक्यातून लीड देऊ. शिक्षक बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे म्हणाले, ‘प्रत्यक्ष काम’ ही शिक्षक संघाची ओळख आहे. विरोधकांनी आपल्या सत्तेच्या काळात बँकेमध्ये केलेला घोडेबाजार हे सूज्ञ सभासद जाणून आहेत. त्यामुळे सूज्ञ सभासद त्यांच्या भूलथापांना कधीच बळी पडणार नाही. सत्तारूढ शिक्षक संघाचे पॅनेल विजयी हॅटट्रिक साधणार यात तिळमात्रही शंका नाही.

यावेळी उमेदवार अनिल चव्हाण, संभाजी सिद, अनिता निटवे, बाबा साळोखे शिवाजी पाटील, डीसीपीएस संघटनेचे सर्जेराव सुतार, शिक्षक सेनेचे कृष्णा धनवडे यांची भाषणे झाली. फिरोज शिकलगार, उदय मोहिते, अशोक भुजवडकर, उत्तम पोहाळकर, शिवाजी चौगुले, दिलीप पाटील, दिलीप आरगे दिलीप राऊत, संजय शिंदे, नंदीवाले, संजय बाबर, जयश्री गोरवे, सरिता कांबळे, भंडे, डांगे, अपराज, नीता पाटील, बबिता व्हनवाडे, रेहना मकानदार, सुरेख कुंभार शेटे, डोईफोडे, रेखा तोरगळे, अनुजा वाघमारे या शिक्षक कार्यकर्त्यांसह सभेला प्रचंड गर्दी होती. स्वागत अनिल चव्हाण यांनी, प्रास्ताविक सी. के. पाटील यांनी आणि सूत्रसंचालन विशाल देसाई, उदय मोहिते यांनी केले. संजय चव्हाण यांनी मानले.