उचगावात वीज बिल वसुलीसाठी आलेल्या वायरमनला मारहाण : एकावर गुन्हा

0
69

करवीर (प्रतिनिधी) : वीज बिलाची थकीत रक्कम वसूल करण्यास गेलेल्या वायरमन शुभम देवेंद्र कांबळे (वय २५, रा. गणेशनगर, उचगाव, ता. करवीर) यास शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नितीन पुंडलिक दाभाडे (महालक्ष्मी कॉलनी, उचगाव पूर्व, ता. करवीर) याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गांधिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शुभम देवेंद्र कांबळे उचगावमध्ये महावितरण कंपनीत वायरमन म्हणून काम करतात. ते नितीन पुंडलिक दाभाडे यांच्या घरी ५२०० रुपये वीज बिलाची थकीत रक्कम वसुली करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी थकीत बिल भरण्यास सांगितले अन्यथा मला साहेबांच्या आदेशाने तुमचा वीजपुरवठा खंडित करावा लागेल असे सांगितले. त्यावेळी दाभाडे यांनी माझ्याकडे आत्ता विज बिल भरण्यास पैसे नाहीत असे म्हणत वायरमन कांबळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या कारणास्तव सरकारी कामात अडथळा आणलेबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक अतुल कदम अधिक तपास करीत आहेत.