शिवसैनिक म्हणून काम करणार : उर्मिला मातोंडकर

0
46

मुंबई (प्रतिनिधी) : ‘मी शिवसैनिक म्हणून आली आहे. शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. काम करण्याची इच्छा असल्याने कोणत्याही अपेक्षाविना शिवसेनेत प्रवेश केला आहे’, अशी माहिती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी दिली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधले. त्यानंतर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘काँग्रेस सोडताना मी राजकारण कधी सोडले नाही. लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. लोकांनी बनवलेली लीडर होणे पसंत करेन. शिवसेनेची महिला आघाडी भक्कम आहे. मला आनंद आहे की मी त्याचा भाग आहे. मुंबईत महिला सुरक्षित असून आणि त्यामुळे मुंबईचा मला अभिमान आहे. भाजपच्या टीकांचे स्वागत करते. सगळे ट्रोल माझ्यासाठी पारितोषकाप्रमाणे आहेत. मी मराठी आहे. ट्रोलमुळे मी पाऊल मागे घेणार नाही.’