उद्धव ठाकरे वाजपेयींचा कित्ता गिरवणार ?

0
65

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण विश्वासदर्शक ठरावात पराभूत होण्याची कुणकूण लागली आहे. त्यामुळे जर बुधवारी सायंकाळी सुप्रीम कोर्टाचा निकाल शिवसेनेच्या विरोधात लागला आणि उद्या गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास मुख्यमंत्री ठाकरे फ्लोअर टेस्ट न करता थेट भाषण करून राजीनामा देण्याची शक्यता आहे.

सध्याची स्थितीत पाहता शिंदे गट वेगळा गेल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिंदे गट गैरहजर राहिले तरी ठाकरे सरकार आपले बहुमत सिद्ध करू शकणार नाही. यामुळे बहुमत सिद्ध न करता मुख्यमंत्री ठाकरे सभागृहात भाषण करून थेट राज्यपालांकडे राजीनामा सादर करण्यासाठी जाऊ शकतात, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या ११ वाजता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.  यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत फ्लेअर टेस्ट घेऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या ११ ते ५ दरम्यान विश्वासदर्शक ठरावावर सर्वांची भाषण होतील. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण होईल. त्यानंतर थेट मुख्यमंत्री राजभवनाकडे रवाना होतील, असा प्लान तयार झाला आहे.

१९९६ मध्ये झालेल्या निवडणुकांत १६१ जागा मिळवून भाजप लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष बनला. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना, समता पार्टी आणि हरियाणा विकास पार्टी यांना २६ जागा मिळाल्या. राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी अर्थातच भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. अटलबिहारी वाजपेयी भाजप संसदीय पक्षाचे नेते असल्याने तेच पंतप्रधान झाले.

भाजपकडे बहुमतासाठी २७३ खासदार नव्हते. त्यामुळे राष्ट्रपतींनी वाजपेयी यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. या काळात काही पक्ष पाठिंबा देतील, असा भाजपचा अंदाज होता. काँग्रेसकडे १४० आणि जनता दलप्रणित राष्ट्रीय आघाडीकडे १५८ खासदार होते. बाकी पक्षांच्या खासदारांची संख्या मोठी होती. पण ते भाजपसोबत नव्हते.

भाजपला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या १९४ वर गेली. लोकसभेत सरकारतर्फे विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. आपले सरकार टिकणार नाही, याची वाजपेयी यांनाही खात्री होती. त्यामुळे ठरावाला उत्तर देतानाच वाजपेयी यांनी म्हटले होते की, टअध्यक्ष महोदय मै अपना त्यागपत्र राष्ट्रपती महोदयको देने जा रहा हूँ’ हा किस्सा आजही प्रसिद्ध आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशाप्रकारे अटलबिहारी वाजपेयी यांचा कित्ता गिरवणार आहेत. आपल्या भाषणात बंडखोरांना आणि त्यांच्या मागील अदृश्य शक्तीला खडेबोल सुनावून आणि शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला भावनिक साद घालून आपला राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सादर करण्याची शक्यता असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.