तीन महिन्यांत हायवेवरील टोलनाके बंद होणार ? : नितीन गडकरींची भन्नाट कल्पना

0
717

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरातील रस्त्यांची दुरावस्था त्यातून हायवेवर केली जाणारी टोलवसुली वादाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. टोल नाक्यांमुळे प्रवासाला लागणारा वेळ आणि फास्टटॅग यंत्रणा राबवल्यानंतरही टोलनाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी चर्चेचा विषय ठरत आहे. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली असून, केंद्राची ही योजना कार्यान्वित झाल्यास टोलनाके आणि तेथे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या कटकटीतून सर्वसामान्यांची सुटका होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

गडकरी म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकार टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम करत असून, आगामी तीन महिन्यात ही योजना प्रत्यक्षात येऊ शकते. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल तेवढाच द्यावा लागेल जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल. यापूर्वीच्या सरकारमध्ये रस्ते योजनांच्या कंत्राटात थोडी आणखी मलाई घालण्यासाठी असे काही टोलनाके नगरपालिकांच्या सीमेत उभारण्यात आले. परंतु हे नक्कीच चुकीचे आणि अन्यायकारक आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

टोलनाके हटवण्याचा अर्थ हा टोल वसूली बंद करण्यावर नाही, तर केवळ टोलनाके हटवणे असा आहे. सरकार सध्या अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे. ज्याच्या माध्यमातून वाहन जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर येईल तेंव्हा जीपीएसच्या मदतीने कॅमेरा तुमच्या वाहनाचा फोटो घेईल. तसेच जेव्हा तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून बाहेर पडाल तेंव्हा तुमच्या वाहनाचा फोटो घेतला जाईल. यानुसार वाहनचालकांना तेवढ्याच अंतराचा टोल द्यावा लागणार असल्याचे गडकरींनी सांगितले.

तसेच हे सर्व टोलनाके काढले गेले तर नक्कीच रस्ता तयार करणारी कंपनी याची भरपाई मागणार आहे. परंतु, सरकारने येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे. जीपीएस ट्रॅकिंगची यंत्रणेच्या चाचणीचे काम सुरू आहे. पुढील तीन महिन्यात यावर धोरण निश्चित करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत ही योजना कार्यान्वित करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, टप्प्याटप्प्याने हायवेवरील सर्व टोलनाके बंद करण्यात येतील. ही यंत्रणा यानंतर जीपीएस प्रणालीवर चालणार आहे.  सध्या केंद्र सरकारने सर्व राष्ट्रीय महामार्गांवर फास्ट टॅगची सुविधा सुरू केली आहे. यामुळे लाईनमध्ये न लागताच ऑटोमॅटिक पद्धतीने टोलनाक्यांवर टोल भरता येऊ शकत असल्याचे ते म्हणाले.