पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युतीच्या चर्चेला सुरूवात झाली आहे. या चर्चांना पूर्णविराम देत  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे स्पष्ट केले आहे. ते पुण्यातील आढावा बैठकीत आज (शुक्रवार) बोलत होते.   

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यानंतर राज्यात नवे  राजकीय गणित जुळून येईल, असे बोलले जात होते. परंतू राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यामुळे भाजप आणि मनसे युती होण्याच्या चर्चा थांबल्या होत्या. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतही ही युती होण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

या बैठकीत फडणवीसांनी पुणे महापालिकेच्या निवडक कामांचा आढावा घेतला. त्याचबरोबर अभय योजना, पीपीपी तत्वावरील प्रकल्प आणि ६ मीटर लांबीच्या रस्त्यांचे रूंदीकरण या महत्त्वाच्या निर्णयांचे स्वागत केले. तर केलेल्या कामांबद्दल पदाधिकाऱ्यांचे देखील कौतुक केले आहे. अशा योजना भाजप सत्तेतील महापालिकेत राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश केल्याचा निर्णयावर राज्य सरकारवर टीका करून महापालिकेने कामाचा वेग वाढवण्याचा सल्ला फडणवीसांनी यावेळी दिला.