मोठी दुर्घटना घडल्यावरच कळे-आसगाव उपकेंद्रातील सर्किट ब्रेकर बदलणार का ?

0
308

कळे (प्रतिनिधी) : महापारेषणच्या कळे-आसगाव उपकेंद्रातील आयुर्मर्यादा संपलेले सर्किट ब्रेकर बदलण्याची गरज आहे. बारा दिवसांपूर्वी येथे झालेल्या सर्किट ब्रेकरच्या स्फोटामुळे हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच या वीज कंपनीला जाग येणार का, असा सवाल होत आहे.

आसगावचा माळ परिसरात १९८० पासून ११०/३३/११ के.व्ही.चे उपकेंद्र कार्यरत आहे. सध्या यासाठी दत्त-दालमिया (आसुर्ले-पोर्ले), डी. वाय.पाटील (आसळज),  कुंभी (कुडित्रे) या कारखान्यांचे ११० केव्हीचे जनरेशन आहेत. या ठिकाणी ३३ के. व्ही. सहा व ११ के.व्ही.चे पाच असे शेतीपंप व गावठाणचे अकरा फिडर आहेत. पुनाळ, सावर्डे, वेतवडे, साळवण, वाळोली या पाच फिडरवरून कळे परिसरात घरगुती व शेतीपंपासाठी वीज पुरवठा केला जातो. या सर्व फिडरवरून सुमारे ५५ हजार व्होल्ट वीज प्रवाहित होते. या विद्युत प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा ब्रेकर आहेत. यात ११ के. व्ही. चे पाच व एक इनकमरचा समावेश होतो.

विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यास विद्युत पुरवठा चालू-बंद करण्याचे काम हे ब्रेकरद्वारे होते. त्यानंतर रिलेवर दोष दाखवला जाऊन दुरुस्तीबाबत संबंधित वायरमनला येथून अवगत केले जाते. शनिवारी ता.२८ नोव्हेंबरला वेतवडे फिडरवर बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विजेचा दाब प्रमाणाबाहेर वाढल्याने काही मिनिटातच या लाइनवरील दोन ब्रेकरचे मोठे स्फोट होऊन त्यांचे तुकडे झाले होते. उपकेंद्रात प्रथमच अशी घटना घडली. या वेळेत कर्मचारी बाहेर असल्याने सुदैवानेच जीवितहानी झाली नव्हती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी एक ब्रेकर जुगाड (जोडाजोड) करून बसवला. तर एक ब्रेकर पूर्णतः खराब झाला. त्यामुळे सध्या पाच ब्रेकरवरच काम चालविले आहे. त्यांचे पार्ट जुने झाले आहेत. त्या वेळच्या ब्रेकर निर्मिती कंपन्याही बंद झाल्या आहेत. साहित्य मिळत नाही. दुरुस्तीसाठी अडचणी येतात. वारंवार विद्युत वाहिन्या बंद राहतात. किरकोळ कारणावरून ट्रिप झाल्यास लाईन सुरू होण्यास विलंब होतो.

सर्वसाधारणपणे ब्रेकरची आयुर्मर्यादा वीस वर्षे इतकी असते, पण सध्या चाळीस वर्षे हे ब्रेकर काम करत आहेत.  त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांनी योग्य डागडुजी व वेळोवेळी केलेल्या निगराणी (ओव्हर ऑयलिंग) मुळे हे ब्रेकर आजतागायत काम करत आहेत. ब्रेकर बदलण्यासाठीचा प्रस्ताव आज अखेरीस वरिष्ठ कार्यालयात सादर झालेला नाही. सध्या तात्पुरत्या स्वरूपात ब्रेकर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महावितरण व महापारेषण दोहोंमध्ये समन्वयाचा अभाव दिसून असल्याने अनेक अडचणी येतात. सर्किट ब्रेकरची क्षमता महावितरणच्या अधिपत्याखाली येत असल्याने दुरुस्ती करण्यास अडचणी येत आहेत. यासाठी महावितरण कंपनीने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

महापारेषणच्या कळे-आसगाव उपकेंद्राचे उपकार्यकारी अधिकारी उपकेंद्र प्रमुख अमोल मोहिते यांनी सांगितले की, ११ केव्हीच्या ब्रेकरची जबाबदारी महावितरणची असते. सध्या पूर्वीपासून सदरचे ब्रेकर आमच्या उपकेंद्रात असल्याने आम्हीच त्याची देखभाल करतो आहोत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून त्यांनी बाहेर जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

महावितरणच्या कळे उपविभाग कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सचिन पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची जबाबदारी महापारेषणची असून दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. दोहोंच्या समन्वयातून ब्रेकरचे सर्व स्ट्रक्चर वर्षभरात उपकेंद्राच्या केबिनच्या बाहेर घ्यायचे आहे. त्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महावितरणकडे येणार आहे.