मुंबई (प्रतिनिधी) : भाजपविरोधात काँग्रेस वगळता इतर विरोधी पक्ष एकत्र येत असून यामध्ये शिवसेनेलाही सहभागी करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आल्या आहेत.

आज (मंगळवारी) रात्री ममता बॅनर्जी शिवसेनेचे युवा नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे शिवसेनेला तृणमूल काँग्रेस हा नवा मित्रपक्ष मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईतील तीन दिवसांच्या दौऱ्यात ममता बॅनर्जी बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. मात्र, त्याआधीच शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक होणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेची  राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासोबत होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.