गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : घरादारावर तुळशीपत्र ठेवून सलग २२ व्या दिवशीही धरणे आंदोलन करणाऱ्या ‘गोडसाखर’च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना काल (गुरुवार) भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भेट दिली. लोककल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसदार भेटीला आला म्हणून भारावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने शिवाजी खोत यांनी राजेंना लवून मुजरा केला. समृद्ध वारशाचे उचित ‘भान’ ठेवून राजकारणापलीकडची स्वतःची वेगळी प्रतिमा जपणाऱ्या राजेंनी त्यांचे पिता स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या कर्मचाऱ्यांना पहिलं अपत्य मानण्याचा विचारांची ‘जाण’ ठेवत मध्यस्थी करण्याची भूमिका मांडली. पण इथूनच अखंड प्रश्नांची मालिकाही सुरू झाली.

उभं आयुष्य कारखान्याच्या नोकरीत घालवून निवृत्तीनंतर स्वतःच्या हक्काचे पैसे मागण्यासाठी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर बसावे लागते, ही गोष्ट लाजिरवाणी असल्याचे सांगून कारखाना व्यवस्थापन, ब्रिस्क कंपनी आणि कामगार यांच्यात एकत्रितपणे चर्चा व्हावी यासाठी कधीही- अगदी मध्यरात्री येण्याची तयारी असल्याचे घाटगे यांनी सांगितले. पण निर्ढावलेल्या संचालकांच्या दारात आपण आता जाणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांची आहे. शिवाय ‘ब्रिस्क’ने कर्मचाऱ्यांची सर्व देणी एकरकमी द्यायला हवीत यावर पण कर्मचारी ठाम आहेत. ब्रिस्कने तीन टप्प्यात देऊ केलेली आणि काही देणी वगळली, हे कर्मचाऱ्यांना अजिबात मान्य नाही. कारखाना कोट्यवधी रुपये तोट्यात गेला असताना कारखान्याकडील कर्मचाऱ्यांची देणी व्यवस्थापन कसे भागवू शकणार हा प्रश्न तर खूपच गंभीर आहे.

अशा पार्श्वभूमीवर या सर्वांमध्ये समन्वय कोण साधणार..? ज्या उपविभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे त्या अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढावा म्हटलं तर त्यांच्याच विरोधात कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी लागत आहे. कारखाना चालवायला दिलाय, त्यामुळे कंपनी आणि कामगार त्यांचं ते बघून घेतील म्हणून संचालक निर्धास्त आहेत. आपण देऊ केलंय तसं कर्मचाऱ्यांनी घ्यावं अशा विचारात कंपनी आहे. तर आता बावीस दिवस लढतोय, अजून थोडं बळ एकवटू… म्हणजे काही ना काही निश्चित पदरात पडेल अशा भाबड्या आशावादात कर्मचारी आहेत. त्यामुळे आता राजेंची ‘मध्यस्थी’ या प्रकरणाला कोणत्या वळणावर नेते आणि यातून काय साध्य होते याकडे ‘गडहिंग्लज’च्या नजरा लागल्या आहेत.