‘गाव करेल ते राव करेल काय’ ? : आ. आबिटकरांचा चंद्रकांतदादांना टोला (व्हिडिओ)

0
1119

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खानापुरातील मतदारांनी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडवत इतिहास रचला आहे. येथे विकासकामांच्या जोरावर विजय मिळवला आहे, असे सांगत ‘गाव करेल ते राव करेल काय’ ? असा सवाल करत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज (सोमवार) जाहीर झाला. त्यानंतर आमदार आबिटकर एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर गटाने सत्ता खेचून आणत सत्तांतर घडवून आणले. आबिटकर गटाचे ६ सदस्य निवडून आले. तर भाजपचे ३ सदस्य निवडून आले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी खानापूर गावासाठी मोठा निधी दिला होता. तरीही या गावातील लोकांनी शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पॅनेलला बहुमत दिले व ग्रामपंचायतमध्ये सत्ता बदल केला. कृषी उत्पन बाजार समिती माजी संचालक बाळासाहेब भोपळे हे शिवसेनेचे आघाडी प्रमुख होते. खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेने प्रथमच भगवा फडकवला आहे.