करवीर (राहुल मगदूम) : नुसते ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेची सर्व प्रशासकीय कार्यालय आणि सीपीआर हॉस्पिटलही कागल तालुक्यात हलवणार, असा संतप्त सवाल कोल्हापूरवासियांतून होत आहे. याला कारण म्हणजे कसबा बावडा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र २२ किमीवर असलेल्या कागल तालुक्यातील सांगाव रोडवरील नवोदय विद्यालय येथे हलविण्याचा घाट घातला जात आहे.

ही इमारत शाहूकालीन असून गेल्यावर्षी या केंद्रावर सुमारे ५० लाख खर्च केल्याचे समजते. तरीही गळकी इमारत तसेच झूम प्रकल्पाचे कारण दाखवत हे केंद्र कागल तालुक्यातील नवोदय विद्यालय शेजारी पाच एकर जागेत हलविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. या केंद्रात 40 ग्रामसेवक 45 दिवसासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. तसेच जुन्या ग्रामसेवकांना 12 दिवसांचे प्रशासकीय  प्रशिक्षण देण्यात येते. येथे सध्या 9 रूम असून त्यामधील तीन महिला तर सहा पुरुषासाठी आहेत. सभागृहात साठ लोकांसाठी आसन व्यवस्था आहे. प्रशिक्षण केंद्रे पूर्वी राहुरी कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत होती. पण 1999 साली ही केंद्रे जिल्हापरिषदेच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे वर्ग केली आहेत.

वास्तविक, राज्याची स्थापना झाल्याच्या वर्षी म्हणजे १९६० साली विचारपूर्वक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र या भागात सुरू केले आहे. मध्यवर्ती बसस्थानक तसेच रेल्वे स्थानक येथून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. मागील ७० वर्षे येथे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे, तर झूम प्रकल्प मागील वीस वर्षे सुरू आहे. राजर्षी शाहू महाराज हे कागलच्या घराण्यातून करवीर संस्थानच्या गादीवर दत्तक आले असले तरीही त्यांनी जिल्ह्याचे ठिकाण असणाऱ्या कोल्हापुरात विविध वसतिगृहे, शाळा, रुग्णालये तसेच रेल्वे स्थापन केली. मात्र, जिल्ह्यातील नागरिकांची कोणतीही गैरसोय केली नाही.

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता वीस वर्षे आहे. पण झूम कचरा प्रकल्प मध्यवस्तीतून हलवला नाही. परिसरातील हजारो नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे प्रशिक्षण केंद्राला इतक्या वर्षानंतर आताच मोठा प्रमाणावर कसा त्रास सुरू झाला आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. ज्याप्रमाणे झूम प्रकल्पाच्या पूर्व बाजूला दहा फूट भिंत बांधून पत्रे लावण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने प्रशिक्षण केंद्राच्या बाजूला पंचवीस तीस फूट उंच भिंत बांधून त्यावर पत्रे लावले तर त्रास कमी होऊ शकतो. झूम प्रकल्पाचे कारण दाखवून ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र अन्यत्र हलविणे धाडसाचे ठरेल. हा एकप्रकारे कोल्हापूरच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न होत असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.