बालासोर : रेल्वे दुर्घटनेत जे दोषी असतील त्यांना सोडले जाणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे स्पष्टपणे सांगितले. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान मोदी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींची प्रकृती जाणून घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.
घटनास्थळावरची परिस्थिती आणि जखमींच्या नातेवाइकांशी बातचित केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काहूर माजलेला होता. त्यामुळे ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण या विषयावर शब्दांमध्ये जास्त बोलू शकत नाही. पण या प्रकरणात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोदी म्हणाले, ‘हा एक अतिशय वेदनादायक आणि अस्वस्थ करणारा अपघात आहे. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. देव सर्वांना बळ देवो, जेणेकरून ते दुःखाच्या वेळी मात करू शकतील.’
मोदी म्हणाले, ‘या दु:खाच्या वेळी सरकार मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहे. रेल्वेने बचाव कार्य आणि रेल्वे ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. आम्ही आमच्या व्यवस्थेला अधिक प्राधान्य देऊन पुढे जाऊ. सरकारसाठी ही घटना अत्यंत गंभीर आहे. प्रत्येक प्रकारच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अपघाताच्या ठिकाणी मोदींनी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि त्यांनी एकजुटीने काम करण्यास सांगितले. घटनास्थळावरून पंतप्रधानांनी थेट कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी फोनवर चर्चा केली. लोकांना चांगली सुविधा मिळावी, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिले. अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला असून, त्यात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड समोर आला आहे.