धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड प्राथमिक आरोग्य केंद्रात चौके, कोनोली, कोते, पडसाळी, बुरंबाळी आणि म्हासुर्ली ही उपकेंद्रे येतात. खेडोपाड्यातील रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी जि. प. सदस्य विनय पाटील यांच्या पाठपुराव्याने म्हासुर्ली उपकेंद्रासाठी रुग्णवाहिका मंजूर झाली. अगदी चारच दिवस ही रुग्णवाहिका धामोड आरोग्य केंद्रात होती, मात्र नंतर ती सरवडे आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आली. त्यामुळे म्हासुर्ली  उपकेंद्राला रुग्णवाहिका कधी तरी मिळणार का ? की काही निष्पापांचा जीव गेल्यानंतरच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला जाग येणार असा संतप्त सवाल केला जात आहे.

कोल्हापूर-राधानगरी मुख्य मार्गापासून पंचवीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर आत असलेल्या म्हासुर्ली आरोग्य केंद्रांअंतर्गत येणाऱ्या वाडीवस्तीतील काही रुग्णांना फक्त वेळेवर पोहचता आले नसल्याने जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षी म्हासुर्लीच्या धनगरवाड्यावर सर्पदंशाने एका मुलाला आणि गरोदर महिलेला कोल्हापूर येथे वेळेवर पोहचता आले नाही म्हणून आपला जीव गमवावा लागला. याची दखल घेत या विभागाचे प्रतिनिधित्व करणारे जि. प. सदस्य विनय पाटील यांच्या प्रयत्नातून म्हासुर्ली उपकेंद्रास रुग्णवाहिका मंजूर ही झाली आणि गायब झाली.

या संदर्भात ‘लाईव्ह मराठी’ने संवाद साधला असता ते म्हणाले की, मागील वर्षी म्हासुर्ली धनगरवाड्यावरील घटनेची दखल घेत आरोग्य विभागाकडे आपण सर्व सदस्यांच्या अगोदर रुग्णवाहिकेची मागणी केली होती. ती मंजूरही झाली. पण ती पुन्हा दुसरीकडे पाठवली गेली. हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे.

म्हासुर्लीचे उपसरपंच राजेंद्र पाटील म्हणाले की, आमच्या उपकेंद्रास रुग्णवाहिका मंजूर होऊन ती धामोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चार दिवस होती. परंतु निवडणूक प्रक्रियेत आपण असल्याने आम्हाला समजण्याअगोदरच ती सरवडे येथे पाठवण्यात आली. हा आमच्या भागावर अन्याय होत आहे. या संदर्भात आपण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे लेखी न्याय मागणार आहे.

दहा वर्षांपूर्वी धामोड प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूर झालेली रुग्णवाहिका अशीच गायब झाली होती. त्यापाठोपाठ हा प्रकार घडला आहे. असा लपाछपीचा खेळ करत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग या विभागातील आणखीन किती निष्पाप जीव जाण्याचे पाहणार आहे, अशी विचारणा ग्रामस्थांमधून होत आहे.