मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यानुसार येत्या ३ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहून फडणवीस हे पुन्हा दिल्लीला रवाना झाले असून, ते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेनेच्या आणि अपक्ष आमदारांची संख्या वाढतच आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ४५ आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. मविआच्या गोटात घडलेल्या या राजकीय भूकंपाचा फायदा नक्कीच भाजपला होणार आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्लीत गेले होते आणि आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली होती.

एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे १० खासदार सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यापैकी चार खासदार हे गुवाहाटीला दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपकडून एक मोठी ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरनुसार, एकनाथ शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रिपद, राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपद, ५ राज्य मंत्रिपद आणि केंद्रात दोन मंत्रिपद देण्यात येणार आहे.

शिंदे गटाने भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केल्यास देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री असताना विधानसभेत केलेल्या शेवटच्या भाषणावेळी फडणवीसांनी एक कविता म्हटली होती आणि त्याच्या शेवटी ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले होते. मात्र, विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना-भाजपत बिनसले. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे हे विराजमान झाले अन् देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंगले होते.