नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. या विरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंदचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता केरळ सरकारही उतरल्याचे दिसून आले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन सुरुवातीपासूनच या कायद्यांच्या विरोधात होते. त्या विरोधात विजयन यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केरळचे कृषी मंत्री व्ही. एस. सुनिल कुमार यांनी सांगितले की, संसदेत हे कायदे पारित झाल्यापासूनच मुख्यमंत्री त्या विरोधात होते. त्यामुळे आता केरळ सरकारने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. या कायद्यांना केरळ राज्यात कोणत्याही परिस्थितीत लागू केले जाणार नाही. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे.