‘कोजिमाशि’च्या सर्वसाधारण सभेविरोधात तक्रार करणार : समीर घोरपडे

0
22

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक (कोजिमाशि) पतसंस्थेची रविवारी झालेली ५० वी ऑनलाईन सभा चुकीच्या पध्दतीने झाली आहे. सभासदांच्या हक्कावर गदा आणण्यात आली आहे. तरी या सभेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करून सभेविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करणार असल्याची माहिती राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचे संचालक समीर घोरपडे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली. 

घोरपडे म्हणाले की, सत्ताधारी गटाने सभासदांच्या हक्कावर गदा आणून सभेला गालबोट लावले आहे. या सर्वसाधारण सभेचा रिमोट सेवानिवृत्त बिगर सभासदाच्या हातात होता. ऑनलाईन सभेत स्क्रीन शेअरींग, चॅट बॉक्समध्ये आपले मत मांडणे किंवा स्पीकरवर बोलणे, असे पर्याय असतात. परंतु तज्ञ संचालकांच्या सुचनेनुसार सभेच्या सुरूवातीपासून हे सर्व पर्याय सामान्य सभासदांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही सभा चुकीच्या पद्धतीने झाली आहे. या सभेची चौकशी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करणार आहे, असे घोरपडे यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला संजय ओमासे,  पी. आर. पाटील,  शहाजी पाटील,  सुरेश खोत, बी. के. मोरे  आदी उपस्थित होते.