कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गगनबावडा तालुका सेवा संस्था गटातून पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तर इतर काही जागा बिनविरोध  करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, याबाबत बोलताना ग्रामविकास मंत्री व बँकेचे माजी अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सर्वच जागा बिनविरोध होणार नसल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.    

ना. मुश्रीफ आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले असता  त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जिल्हा बँकेसाठी सर्वच जागा बिनविरोध होतील, असे वाटत नाही. आज उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसमवेत जिल्हा बँक निवडणूक संदर्भात बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे कोणाला थांबवायचे? हा मोठा प्रश्न नेत्यांसमोर उभा राहिला आहे. तालुका सेवा संस्था गटातून काही ठिकाणी चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे.    त्यामुळेच बिनविरोध होण्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.