छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार ? : निर्दोष मुक्ततेविरोधात याचिका   

0
8

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे. याबाबत मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती दमानिया यांनी ट्विट करून दिली आहे.

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी ९ सप्टेंबरला छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावरील आरोप निराधार असल्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करण्याची मागणी भुजबळ यांनी केली होती.

यावर भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला भ्रष्टाचार विरोधी कार्यालयाने आव्हान दिलेले नाही. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. मी मुंबई उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्तता केल्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे, असे दमानिया यांनी म्हटले आहे.