मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात बैलगाडा आणि बैलांच्या शर्यतीवर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. ही बंदी उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे याकडे सर्व शर्यतशौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यात बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी शर्यत प्रेमींकडून सतत केली जात आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने याचिका दाखल करत सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून सोमवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, तमिळनाडूमधील ‘जल्लिकट्टू’ या बैलांच्या खेळाप्रमाणे महाराष्ट्रात  बैलगाडी-बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करून त्याविषयीच्या नियमांचा मसूदा तयार केला आहे. राज्यातील विविध भागांत दिवाळी दरम्यान बैलगाडा शर्यती होत असतात. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतींवरील बंदी कायम ठेवल्याने शर्यती आयोजकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.